शिक्षण
आनंददायी असायला हवं याविषयी कुणाचंच दुमत नसतं, पण प्रत्यक्षात भरपूर
विद्यार्थिसंख्या असलेले वर्ग, शैक्षणिक सुविधांचा, इच्छाशक्तीचा
अभाव, घरचे अशैक्षणिक वातावरण, सगळ्याच पातळ्यांवर आलेले मरगळलेपण
या सगळ्यामधून आनंददायी शिक्षण वजा होतं. केवळ आईवडील पाठवतात म्हणून मुलं
शाळेत जातात, पण शाळेत रमत नाहीत. हळूहळू शाळागळती सुरू होते.
मूल शाळेत रमावं, शिक्षण
आनंददायी व्हावं, यासाठी वेगवेगळे प्रयत्न झाले आहेत. शिक्षणाच्या प्रयोगशाळा ठराव्यात अशी
अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत, पण या शाळा अगदी थोडय़ा ठिकाणी
असतात. सगळी मुलं या शाळांचा, तिथल्या शैक्षणिक उपक्रमांचा, प्रयोगांचा
लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रायोगिक शाळांमधून शिकलेल्या मुलांची
शैक्षणिक गुणवत्ता वेगळी ठरते. सर्वसामान्य शाळांमधून शिकलेल्या मुलांची
गुणवत्ता त्यांच्यापेक्षा वेगळी ठरते. म्हणूनच गरज असते ती कोणतेही प्रयोग
सर्वसमावेशक असण्याची. एकाच वेळी सर्वाना सामावून घेणारे प्रयोग सर्वसामान्य
शाळांच्या पातळीवर झाले, तर ते जास्तीत जास्त मुलांपर्यंत
पोहोचतील, त्यांना त्यांचा लाभ मिळेल आणि मोठय़ा प्रमाणात बदल घडतील. सगळ्यांसाठीच
शिक्षण आनंददायी ठरेल.
आपल्याकडचे भरगच्च वर्ग बघितले तर
मोठय़ा स्वरुपात शैक्षणिक प्रयोग ही गोष्ट अशक्य वाटते ना?
पण जालना जिल्ह्य़ातल्या शिक्षकांनी
नेमकी हीच गोष्ट शक्य करून दाखवली आहे. त्यासाठी निमित्त ठरलं आहे ते शाळा
उन्नती अभियान. ऑगस्ट २०१२ पासून जालना जिल्ह्य़ात सुरू असलेल्या या
अभियानामुळे जिल्हा परिषदांच्या शाळा एकदम बदलून गेल्या आहेत.
शैक्षणिक उपक्रमांचा जिल्हा म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्य़ाने आजपर्यंत राज्याला स्वाध्यायपुस्तिका, बालोद्यान, गंमतशाळा
यांसारखे दर्जेदार उपक्रम दिले. असाच या शैक्षणिक वर्षांतला जालना जिल्हा
परिषदेचा उपक्रम, ‘शाळा उन्नती अभियान’ १५५२ शाळांमधून राबविला जातोय. या
अभियानाअंतर्गतची सगळ्यात ठळक गोष्ट म्हणजे सगळ्या शाळांना एकसारखाच रंग
दिल्यामुळे जिल्हा परिषद शाळांचं रूपडं बदललं आहे. गावातल्या जुन्या पडक्या
शाळांना एकसारखीच रंगसंगती केल्यामुळे त्या एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या
शाळांप्रमाणे वाटू लागल्या. त्या जणू काही एखाद्या नववधूप्रमाणे नटल्या आहेत.
शाळा परिसरात जमिनीपासून तीन
फुटांपर्यंत रंग देऊन त्या भिंतींवर वेगवेगळी चित्रं, वेगवेगळी
माहिती देणारा मजकूर रंगवण्यात आला. उदाहरणच द्यायचं तर सात रंग, सात वार
यांची माहिती, मराठी-इंग्रजी महिन्यांची यादी भिंतींवर रंगविण्यात आली. ऋतूनुसार
महिन्यांची माहिती शाळेतल्या भिंतींवर दिली गेली. वेगवेगळ्या भौगोलिक आकृत्या, रचना, नकाशे
आसपासच्या भिंतींवर रंगवलं गेल्यामुळे सतत मुलांच्या डोळ्यांसमोर राहिल्यामुळे
त्यांना त्याची गोडी वाटायला लागली. शाळांच्या पायऱ्यांवर पावलांचे ठसे काढून
त्यात अंक रंगवले गेले. पहिली-दुसरीतल्या मुलांना हा प्रकार फारच आवडला. ते
आकडे मोजत मोजत
त्या पावलांवर धावणं हा त्यांचा खेळच झाला. शाळेच्या, गावाच्या
भिंतीवर गणित आणि शब्दकोडी बघून मुलांना ती सोडवावीशी वाटायला लागली. मराठी-
इंग्रजी स्वर सतत डोळ्यांसमोर राहिल्यामुळे ते पाठ करण्याची मुलांना गरज
पडेनाशी झाली. उंची मोजण्याच्या मोजपट्टीने मुलं आपापली उंची मोजायला लागली.
नेहमी उंची मोजत राहिल्यामुळे त्यांना वाढ होणे म्हणजे काय ही संकल्पना
समजायला मदत झाली. भाषेतले समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, बाराखडी, हे सगळं
वर्गात घोकंपट्टी करत शिकण्यापेक्षा कृती फलकांवर बघत असल्यामुळे मुलांना ते
शिकणं म्हणजे काही तरी अवघड अभ्यास करणं आहे, असं वाटेनासं झालं. त्यांनी आपल्या
वर्गाचा, शाळेचा नकाशा तयार केला. त्यातून हळूहळू जिल्ह्य़ाचा, राज्याचा
नकाशा कसा वाचायचा हे ती आपोआपच शिकली.
प्रक्रियेत लोकांचा
सहभाग वाढवला. गावागावांतून नागरिक आपापल्या परीने शाळा विकासासाठी पैसे देऊ
लागले, तर
काही जणांनी सिमेंट पोल देऊन शाळेला कंपाऊंड करा, असे सांगितले. बऱ्याच जणांनी मोफत श्रमदान केले. या
अभियानाने शाळेकडे बघण्याची लोकांची मानसिकता बदलली.
शाळांचा भौतिक विकास करणे हा या अभियानाचा केवळ एकमेव उद्देश नाही.
त्याबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी विविध उपक्रमांचे-
स्पर्धाचे आयोजनदेखील केले गेले. त्यामुळे आजमितीस तांडा, वस्त्या, वाडय़ातील
मुलांना स्पर्धा परीक्षा काय असतात याची माहिती झाली. मुलांना शाळेत जाणे, शिकणे
मनापासून आवडायला लागले आहे.
या अभियानाने शिक्षणाच्या
प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढवला. गावागावांतून नागरिक आपापल्या परीने शाळा
विकासासाठी पैसे देऊ लागले, तर काही जणांनी सिमेंट पोल देऊन
शाळेला कंपाऊंड करा, असे सांगितले. बऱ्याच जणांनी मोफत श्रमदान केले. या अभियानाने शाळेकडे
बघण्याची लोकांची मानसिकता बदलली. अधिक सकारात्मक केली.
शाळा उन्नती अभियानातील उपक्रम-
मुलांची शैक्षणिक गुणवत्ता
वृद्धिंगत व्हावी यासाठी दर आठवडय़ाला किंवा अभ्यासक्रमांचा एक घटक शिकवून
झाल्यानंर शाळा स्तरावर किमान १० गुणांची एक चाचणी घेतली जात आहे. या
चाचणीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला २०० पानांची वही पुरवली जाते. या चाचणीची
तपासणी दर शनिवारी नियमितपणे होते. या चाचणीमुळे पहिली ते सातवीच्या मुलांची
उपस्थिती वाढली आहे. त्यासोबतच मुलांना अभ्यासाची आणि शिक्षकांना नियमितपणे
अध्यापनाची सवय लागली आहे. दर महिन्याला केंद्रप्रमुख स्वत: प्रश्नपत्रिका
काढून २० गुणांची चाचणी घेतात. तालुका स्तरावरून गट शिक्षण अधिकारी सहामाही व
वार्षिक मूल्यमापनासाठी ५० गुणांची एकाच वेळी चाचणी घेणार आहेत.
- शिष्यवृत्ती सराव परीक्षा- इयत्ता चौथी व सातवीतील मुलांना शिष्यवृत्ती
परीक्षेची माहिती व्हावी तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक
व्हावेत या हेतूने डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन
महिन्यांत खास सराव परीक्षा घेतली जाते. या माध्यमातून गुणवत्ता वाढीला चालना
मिळत आहे.
जिल्ह्य़ातील सर्व शाळांतील
मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या माहितीसोबतच सामान्य ज्ञानाची आवड निर्माण
व्हावी हा हेतू आहे. त्यासाठी इयत्ता तिसरी व सहावीच्या मुलांसाठी सर्व
विषयांवर आधारित प्रत्येक विषयासाठी एक हजार प्रश्न तयार करून जिल्हा सामान्य
ज्ञान स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
जिल्ह्य़ातील शैक्षणिक गळती कमी
होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
गणित विषयाबाबत मुलांच्या मनात भीती
राहू नये यासाठी विविध प्रकारच्या खेळाच्या माध्यमातून गणितसमृद्धी केली जात
आहे. तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या सुरुवातीला केंद्रस्तर, तालुकास्तर व
जिल्हास्तर याप्रमाणे आयोजन केले जाणार आहे. तालुका स्तरापर्यंत सर्व ठिकाणाच्या
प्रश्नमंजूषा स्पर्धा पार पडल्या असून, आता जिल्हास्तरावर प्रत्येक
तालुक्यातून आलेल्या वयोगटनिहाय मुलांची स्पर्धा होणार आहेत. त्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय
क्रमांक निवडण्यात येतील व त्यांना आकर्षक रोख बक्षिसेदेखील दिली जाणार आहेत.
प्रश्नमंजूषा स्पर्धेमुळे गावागावातील शाळांमध्ये ‘कौन बनेगा
करोडपती’सारखे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमुळे आजमितीस मुले
आपल्या देशाविषयी, राज्याविषयी अधिक माहिती मिळवत आहेत.
- रेन वॉटर
हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पावसाळ्यात शाळेच्या छतावर पडणारे पाणी वाया जाऊ
नये, यासाठी प्रत्येक शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग झाले असून, यातून जमिनीत
जास्तीत जास्त पाणी मुरवून शालेय परिसरात जास्तीत जास्त हिरवळ जोपासणी व
निसर्ग संवर्धन करणे हा हेतू अपेक्षित आहे.
- विद्यार्थ्यांना
जग, भारत, महाराष्ट्र यांची भौगोलिक, राजकीय, प्राकृतिक
परिपूर्ण माहिती व्हावी यासाठी पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी असे गट करून
नकाशावाचन स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नकाशा ओळख
तर झालीच, मात्र त्यासोबतच भूगोल या विषयाची आवड निर्माण झाली.
शाळा स्तरावर प्राप्त होणाऱ्या अनुदानातून
मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेत अभ्यासक्रमातील चित्रांची रंगरंगोटी शाळेच्या
भिंतीवर केली आहे. याचा उपयोग पहिली आणि दुसरीच्या मुलांना जास्तीत जास्त
झालेला आढळला. कारण त्या वयात मुलांना शाळेची गोडी लावण्यासोबतच त्यांना
पुस्तकी ज्ञानाची माहिती व्हावी, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सदर
उपक्रम या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांविषयी
मुलांमध्ये आवड निर्माण होऊन त्यांनी स्वत:हून या विषयातील नवनवीन संकल्पना
हाताळाव्यात यासाठी शाळा सुटल्यानंतर दररोज एक तास शिक्षक देत आहेत.
विद्यार्थी त्यासाठी एक स्वतंत्र वही ठेवून त्यात उदाहरणे सोडवत आहेत. असेच
इंग्रजी व विज्ञान विषयासाठी केले जात आहे.
|
No comments:
Post a Comment